एका दूरच्या गावात शाळाभेटीसाठी मी गेले होते. “सागर – समुद्र ; गिरी – डोंगर ; जीवन – पाणी ...” सरांच्या मागून वर्गातल्या मुलांचा एकत्र आवाज येत होता. गाव असो की शहर, शाळेत भाषेच्या तासाला हे खूप ठिकाणी घडताना दिसतं. शब्दसंग्रह वाढवणं हे भाषाविकासाचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. धड्यातले शब्द अर्थासकट पाठ करून घेतले, की भाषा समृद्ध होईल असा एक समज आपल्या शाळांमध्ये रुळलेला दिसतो. मुलांना वर्गात, गृहपाठ म्हणून,परीक्षेसाठी शब्दांच्या याद्या अर्थासकट पाठ करायला दिल्या जातात.
“पुढील शब्दांचे अर्थ लिहा” असा प्रश्नसुद्धा परीक्षेत विचारला जातो. पण यामुळे मुलांच्या बोलण्यात, लेखनात त्यांची भाषा समृद्ध झाल्याचं प्रतिबिंब उमटलेलं दिसत नाही. समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्दांच्या अशा याद्या घोकून भाषाविकास होत नाही. शेंदरी आणि भगवा या शब्दांचा अर्थ केशरी हाच असला तरी कोणीही मराठी भाषक ‘शेंदरी भात’ किंवा ‘भगवे श्रीखंड’ म्हणत नाहीत! कोणता शब्द भाषेत कोणत्या संदर्भात वापरला जातो याबाबतची समज वाढणं म्हणजे खरा भाषाविकास. म्हणून, मुलांना शब्दार्थांच्या याद्याच्या याद्या पाठ करायला न देता, नवीन शब्द कोणत्या संदर्भात वापरतात हे सांगायला हवं.
शाळेमधील वातावरण आनंददायी करण्यासाठी बाह्यसजावटीपेक्षा शिक्षकाचा उत्साह आणि शिक्षक-मुलं यांच्यातील सहज संवाद आवश्यक असतो. सदैव नाविन्याच्या शोधात असणारा, भरभरून बोलणारा, प्रयोग करून बघणारा, स्वत: काहीतरी सतत शिकत राहणारा, मुलांबद्दल आत्यंतिक प्रेम असणारा शिक्षक होण्यासाठी औपचारिक शिक्षणाची गरज असतेच असं नाही.कधी कधी वाटतं की बी. एड. डी. एड. असं औपचारिक शिक्षण घेतलेला शिक्षक ‘शिक्षणशास्त्रात’ अडकून रूक्ष तर होत नाही ना? मुलांचा विकास घडवतानाच आपलाही विकास घडत आहे यावर शिक्षकांचा दृढ विश्वास असायला हवा. आपण घेतलेल्या प्रशिक्षणांमधून, स्वत:च्या कल्पनांमधून, सहकार्यांबरोबर केलेल्या चर्चांमधून नवे प्रयोग करून बघण्याची वृत्ती, स्वत:चा विकास साधण्यासाठी स्वत:चे परखड मूल्यमापन करण्याचा दृष्टिकोन, आपल्या जबाबदारीची जाणीव, याबाबत शिक्षक जागरुक असला पाहिजे.
आपण जे काम करत आहोत, ते आपल्याला आनंददायी वाटले तरच ते मुलांनाही आनंददायी वाटणार आहे; या प्रेरणेमुळे शिक्षणाचे खरे उद्दिष्ट पूर्ण होईल. असे शिक्षक जिथे असतील तिथे मोकळे, मैत्रीपूर्ण वातावरण असते. अशा वातावारणात मुले शिकण्यासाठी जास्त उत्सुक, मोकळी, बडबडी होतात. आपल्याला जे वाटते ते कोणत्याही दडपणाशिवाय, न घाबरता व्यक्त करुन धिटाईने प्रश्न विचारतात. असे वातावरण म्हणजेच खरे शैक्षणिक वातावरण! अशा वातावरणात मुलांना त्यांच्या कलाने, गतीने शिकून आत्मविश्वासाने शाळेत आणि समाजात वावरता येते. विचारस्वातंत्र्य व त्यांच्या क्षमतांना वाव मिळाल्याने ही मुले निर्णयक्षम, सर्जनशील बनून त्यांचा विकास घडतो. आनंदनिकेतनमध्ये अशा प्रकारचे शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यात आम्ही बर्यापैकी यशस्वी झालो आहोत असे म्हणणे अतिशयोक्तीचे नाही. आनंदनिकेतनच्या ताई (शिक्षिका).शिकवताना नेहमी नवीन काहीतरी करून बघतात, एखादी संकल्पना प्रत्येक मुलाला समजेपर्यंत स्वस्थ न बसता, खेळ तयार करून त्यातून शिकवता येईल का?, प्रत्यक्ष भेट दिली आणि बघितले तर मुलांना नीट समजेल का?, असे विचार आणि चर्चा शाळेत सतत सुरू असतात. मला आठवतंय शाळा सुरू करताना शाळेच्या संस्थापिका विनोदिनी ताई, लीलाताई पाटील (सृजनानंद, कोल्हापूर) यांना भेटल्या तेव्हा लीलाताई म्हणाल्या होत्या, “थोडसं पाहून करा आणि जास्त करून पाहा!” मला वाटतं आमच्या ताई हे सूत्र तंतोतंत पाळतात. कायमस्वरूपी विनाअनुदानित शाळेत अल्प मानधनावर काम करत असूनही शिक्षक इतके उत्साही, हसत-खेळत नवनव्या गोष्टी करायला, शिकायला तयार कसे? या प्रश्नाचं उत्तर दडलंय ते शाळेने जाणीवपूर्वक जोपासलेल्या ‘स्वातंत्र्य’ या मूल्यात! शाळेत नव्याने रुजू होणाऱ्या ताईच्या पदवीपेक्षाही, त्यांचे मुलांवरील प्रेम आणि शाळेची शिक्षणपद्धती आत्मसात करून त्याप्रमाणे सतत स्वत: शिकत राहणे, याला महत्व देऊन यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात
दरवर्षी जूनमध्ये नाशिकजवळच्या एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी आयोजित केलेल्या दोन दिवसांच्या निवासी शिबिरामध्ये ताईंची एकमेकींशी जवळीक वाढते. शाळेच्या ध्येयधोरणांबद्दल चर्चा व काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. दंगामस्तीही होते. एखादा शैक्षणिक प्रयोग करून बघायला मुख्याध्यापकांची किंवा संस्थाचालकांची परवानगी घ्यावी न लागता त्यांच्याकडून नेहमी प्रोत्साहनच मिळतं. स्वत:तले अंगभूत गुण शोधण्याची,जोपासण्याची संधी प्रत्येकीला दिली जाते. मुख्याध्यापकही दर पाच वर्षांनी बदलतात. आळीपाळीने सगळ्यांनाच जबाबदारीची कामं करायला मिळतात. ताईंच्या सुट्ट्यांची मोजणी न करता त्यांच्यावर विश्वास दाखवला जातो. शाळेने दाखवलेल्या या विश्वासाची बांधिलकी ताईही मनापासून जपतात. शाळेत अधिकारांची उतरंड, संस्थाचालकांचं दडपण नाही. ‘दुसर्यांनी घेतलेले निर्णय आपल्याला पटो न पटो आपण ते राबवायचे’ असं स्वरूप नाही. या वातावरणामुळे चुका सकारात्मकरित्या
स्वीकारण्याची आणि सुधारण्याची नकळतच सवय लागते. संस्थाचालकांचा, मुख्याध्यापकांचा वेगळा कक्ष नाही. स्वतःचे काम तन्मयतेने आणि समरसून करण्याची अंत:प्रेरणा निर्माण होते. नवीन शिकण्याची, प्रयोग करण्याची समृद्ध होण्याची प्रक्रिया अखंडपणे सुरू राहते.
आपले विचार व्यक्त करण्याचे माध्यम म्हणून भाषेकडे पाहिले जाते. त्याचप्रमाणे विचार करणे हे देखील भाषेच्या माध्यमातून शक्य होत असते. आपली अनुभवाच्या आधारे भाषेचीच मदत घेत ज्ञानाची निर्मिती करण्यास मदत होत असते. त्यामुळे शिक्षणाच्या दृष्टीने भाषेचे अनन्य साधारण महत्त्व आहे. यात गणित शिक्षणाच्या दृष्टीने देखील भाषेचे महत्त्व तितकेच महत्त्वाचे आहे. गणित शिक्षणाच्या दृष्टीकोनातून पहिले तर गणिताचा भाषेशी तिहेरी संबध आहे.
1. गणित शिक्षक आपल्या तासाला वापरतो ती भाषा किंवा गणिताच्या पाठ्यपुस्तकात असलेली भाषा
2. प्रत्येक विषयाच्या अभ्यासाची एक विशिष्ट भाषा असते तशी गणिताची भाषा
3. गणित हीच एक प्रगत भाषा आहे.
पहिला संबध पाहिला तर आपल्या लक्षात येते कि, वर्गातील प्रत्येक मुलाला पाठ्य पुस्तकातील भाषा समजत असतेच असे काही नसते. कारण मुले हि समाजातील वेगवेगळ्या थरातून येत असतात. त्यांची बोलीभाष व वर्गातील भाषा यात तफावत असू शकते.या तफावतीमुळे कधीकधी मुलांच्या विचार प्रक्रियेला खीळ बसते. खरे तर भाषेचा विकास हा तिच्या वापरातून होत असतो. त्यामुळे मुलांच्या बोलीभाषेला गणितातही संधी मिळायला हवी.
दुसरे म्हणजे प्रत्येक विषयाची स्वत:ची अशी एक विशिष्ट भाषा असते. तशी ती गणिताची देखील आहे. उदाहरणार्थ जसे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, चौरस, आयात, शेकडेवारी, अपूर्णांक,+ ,x, यासारखी चिन्हे हे सारे गणिताच्या विशिष्ट भाषेचाच भाग आहे. हि भाषा शिकणे आणि त्याचा गणितीय संबोधा शी सह सहसंबध लावता येणे हा गणितातच एक महत्त्वाचा भाग आहे. कारण गणिताची मांडणी आणि त्या गणिताची उकल करण्यासाठी हे सारे गरजेचे आहे. मुलांना हि भाषा नवीन असते आहे ती त्यांना फक्त शाळेतच शिकायला मिळते त्यामुळे त्यांना ती वेगळी वाटते. उदाहरणार्थ वर्गात ‘सरळ रेषा’ हां शब्द आला तर मुले त्याचा अर्थ ‘आडवी रेषा’ असा लावतात. तिरपी रेषा फळ्यावर काढून तिला सरळ रेषा म्हटल्याने मुलांच्या मनात गोधळ निर्माण होतो. अशा बाबींवर वर्गात काम व्हयला हवे.
तिसरे म्हणजे गणित हीच एक प्रगत अशी भाषा आहे. भाषेचे जसे व्याकरण असते त्यानुसार गणिताचे व त्या गणितीय भाषेचे देखील काही नियम आहेत. गणित शिकतांना तर्काची गरज लागते. त्यामुळे गणिताला तर्कशास्र असेही म्हणतात. गणितावर प्रभुत्त्व मिळविण्याकरिता तर्कावर प्रभुत्त्व संपादन करणे जरुरी आहे. उदा. जसे चौरस हा आयात असतो ,मात्र प्रत्येक आयात हा चौरस नसतो. तर अंक ह्या संख्या असतात मात्र प्रत्येक संख्या हि अंक नसते. अनेक विचारातून योग्य निष्कर्ष काढण्याचे कौशल्य मुलांना जमायला हवे. त्या करीता जाणीव पूर्वक प्रयत्न करायला हवेत.